"साहसे श्री: प्रतिवसती"

यवतमाळ हा विदर्भाच्या आंध्र प्रदेश सध्याचे तेलंगाना राज्याच्या सिमेलगत असलेला फारसे उद्योग नसलेला परंतु नैसर्गिक साधन संपत्ती मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेला व उच्च प्रतीचा कापूस पिकविणारा जिल्हा म्हणून ज्ञात आहे. यवतमाळ शहरात सामान्य जनांच्या आर्थिक गरजा पूर्ण व्हाव्या व त्यांनी बचतीची सवय लावावी या करीत त्यांना त्यांचे व्यवहार कायद्याच्या चौकटीत राहून नि:संकोच पणे करता यावेत म्हणून १९६५ साली तत्कालीन मा. जिल्हा संघचालक स्व. श्री. श्री. द. उपाख्य बाबाजी दाते यांच्या पुढाकाराने आपल्या बँकेची स्थापना करण्यात आली. बँकेचे सुरवातीचे नाव दि संकटमोचन अर्बन को-ऑप. बँक लि., यवतमाळ असे होते व पंजीयन क्र. वायएमएल / बीएनके / ११४ असा आहे.

बँकेला कामकाज सुरू करण्याची परवानगी (रजिस्ट्रेशन) दि. १२ एप्रिल १९६५ रोजी मा. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, यवतमाळ यांनी दिली व बँकेचे प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात दि. ०७ मे १९६५ रोजी अवधुतवाडी यवतमाळ येथील कार्यालयाचे उद्घाटन श्री. बाबासाहेब घारफळकर, अध्यक्ष यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. यांच्या हस्ते होवून झाली.

बँकेची सुरवातीची सभासद संख्या १२९ होती व भागभांडवल रु. ३०१००/- एवढे होते. पहिल्या वर्षी दि. ३० जून १९६६ रोजी संपणाऱ्या वर्ष अखेरीस बँकेच्या ठेवी रु. ८५०६८/- कर्ज रु. १११५८४/- व नफा रु. ११४०.३३ एवढा होता.

बँकेचे प्रथम व्यवस्थापक म्हणून स्व. श्री. के. उ. पांडे काम पाहत होते. बँकेच्या सुरवातीचे संचालक मंडळ

  • १) श्री. श्रीकृष्ण द. दाते - अध्यक्ष
  • २) श्री. विश्वनाथ द. पेंडसे - उपाध्यक्ष
  • ३) श्री. गोपाळ रा. तेलंग - संचालक
  • ४) श्री. राजाभाऊ शे. देशपांडे - संचालक
  • ५) श्री. काशीनाथ ज. संगेवार - संचालक
  • ६) श्री. पांडुरंग म. जोगळेकर - संचालक
  • ७) श्री. नारायण सि. गद्रे - संचालक
  • ८) श्री. भास्कर वि. कुंटे - संचालक
  • ९) श्री. वसंत ल. फडणीस – संचालक

सुरवातीच्या काळात वरील संचालकांच्या मार्गदर्शनाखाली बँक यवतमाळात सामान्य जनांची बँक म्हणून ओळखली जाऊ लागली.

सन १९६९-७० साली झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांनी बँकेचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला व सहकार विभागाच्या परवानगी नंतर बँक दि. ०५/०८/१९७१ पासून संकटमोचन अर्बन को-ऑप. बँक लि. यवतमाळ ऐवजी दि. यवतमाळ अर्बन को-ऑप. बँक लि. म्हणून ओळखली जाऊ लागली.

सन १९७२ पर्यंत बँकेची एकाच शाखा यवतमाळ शहरात कार्यरत होती. बँकेने अनेक होतकरू उद्योजकांना कर्ज रूपाने मदतीचा हात दिला होता व सामान्यांना बचतीची दिशा दिली.

सन १९७२ मध्ये बँकेचा पहिला शाखा विस्तार करण्यात आला व दि. ०९ एप्रिल १९७२ रोजी आंध्र प्रदेशाच्या सिमेवरील आदिवासी क्षेत्रातील गाव पाटणबोरी सारख्या साधन सोयी उपलब्ध नसलेल्या ठिकाणी उत्कृष्ठ कार्य केले व करीत आहे. अनेक तरुणांना उद्योग करीता तसेच शेती हा मुख्य व्यवसाय असल्यामुळे शेतीपूरक व्यवसायाकरीता मदतीचा हात देऊन स्वतःच्या पायावर उभे करण्याकरिता मदत केली.

३० जून १९७२ रोजी बँकेच्या ठेवी रु. ६.३७ लाख, कर्ज रु. ५.३८ लाख व भागभांडवल ०.८६ लाख एवढे होते.

"एकमेका साहाय्य करू । अवघे धरू सुपंथ ।"

या सहकार मंत्रा प्रमाणे बँकेची उत्तरोत्तर प्रगतीकडे वाटचाल सुरू आहे.

बँकेने एक कोटी ठेवी गोळा करण्याच्या महत्व पूर्ण टप्पा सन १९८३-८४ मध्ये पूर्ण केला. दि. ३० जून १९८४ अखेरीस बँकेच्या ठेवी रु. १०५.५७ लाख कर्ज रु. ७६.२४ लाख व भागभांडवल रु. ७.३९ लाख एवढे होते.

त्यानंतर बँकेची प्रगती जोमाने सुरू झाली. बँकेची तिसरी शाखा आर्णी येथे दि. २९ एप्रिल १९९० व चौथी शाखा वणी येथे दि. ०२ जुलै १९९२ रोजी उघडण्यात आली. या दोन्ही शाखा मोठा व्यवसाय करून बँकेच्या महत्वाच्या शाखा म्हणून नावारूपाला आल्या आहेत.

बँकेचा शाखा विस्ताराला खऱ्या अर्थाने १९९४ साली सुरवात झाली व यावर्षी एकूण ०६ शाखा उमरेड, दिग्रस, नेर, घाटंजी, ढाणकी व पांढरकवडा येथे उघडण्यात आल्या. आता बँक आपल्या दहा शाखांसह कार्यरत झाली व याच वर्षी दहा कोटी ठेवी गोळा करण्याचा टप्पा सुद्धा बँकेने पूर्ण केला.

३१ मार्च १९९४ अखेरीस ठेवी रु. १०९८.७५ लाख, कर्ज रु. ७५०.०३ लाख व भागभांडवल रु. ४४.८८ लाख एवढे होते.

बँकेची दिवसेंदिवस होणारी प्रगती पाहून १९९६ साली भारतीय रिझर्व्ह बँकेने बँकेला अनुक्रमे ०४ व ०३ शाखा उघडण्यास परवानगी दिली. त्यानुसार १९९६ साली दारव्हा, राळेगांव, कळंब व पुसद तर १९९७ साली वीर सावरकर मार्ग यवतमाळ., बाभुळगांव व वडगांव शाखा सुरू करण्यात आल्या. तसेच बँकेची अठरावी शाखा चंद्रपूर येथे दि. ०२ फेब्रुवारी १९९८ रोजी उघडण्यात आली.

बँकेचा शाखा विस्तार होत असतांना बँकेने ध्येया प्रमाणे सामान्य लोकांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्याचे काम सुरूच ठेवले असून बँकेचा ग्राहक वर्ग विदर्भात मोठ्या प्रमाणात आहे.

बँकेने सन १९९८-९९ या आर्थिक वर्षात मोठी भरती घेऊन शंभर कोटी ठेवींचे उद्दिष्ट पूर्ण केले.

सन २००० साली बँकेची वाटचाल पाहून भारतीय रिझर्व्ह बँकेने बँकेला आणखी पाच शाखा उघडण्याची परवानगी दिली. त्यानुसार अमरावती, गडचांदूर, भद्रावती, नागपूर (देवनगर) व अकोला शाखा उघडण्यात आल्या.

या नंतरचा काळ हा भारतीय बँकिंग क्षेत्रात मोती स्थित्यंतरे घडवून आणणारा काळ होता. काही सहकारी बँकांच्या व्यवहारामुळे भारतीय रिझर्व्ह बँकेची सहकारी बँकांकडे पाहण्याची दृष्टी बदललेली होती. त्यामुळे शासनाची व केंद्रीय बँकेची धोरणे सुद्धा नागरी सहकारी बँकांना अनुकूल नव्हती. या काळात बँकेने काळाची पावले ओळखून स्वतःची पावले टाकणे सुरू ठेवले व कार्यरत असलेल्या शाखांच्या व्यवसाय वाढीवर भर दिला. व्यवसाय वाढ करतांना कर्ज वसुली कडे विशेष लक्ष देऊन आपली आर्थिक स्थिती मजबूत करण्यावर भर देण्यात आला त्याचे फळ लवकरच मिळू लागले. या काळात बँकेचे आधुनिकरण करून सर्व शाखा संगणीकृत करण्यात आल्या. कर्मचाऱ्यांना संगणक वापराचे प्रशिक्षण देण्यात येऊन तत्पर ग्राहक सेवा देण्यास प्रवृत्त करण्यात आले. त्यामुळे बँकेला मोठा ग्राहक वर्ग प्राप्त झाला.

सन २०१२-१३ बँकेचे रु. १००० कोटी ठेवीचे उदिष्ठ पूर्ण केले व विदर्भातील एक अग्रगण्य नागरी सहकारी बँक म्हणून नावारूपाला आली. बँकेने शाखा विस्तार करण्याची इच्छा दर्शविल्यानंतर भारतीय रिझर्व्ह बँकेने १३ शाखा उघडण्यास परवानगी दिली. यापैकी ११ शाखा बँकेने उघडून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात बँकेने आपला शाखा विस्तार केला. यामध्ये नागपूर येथे तीन शाखा, नांदेड, औरंगाबाद, जालना, अहमदनगर, पुणे, गोंदिया व हिंगणघाट येथे शाखा उघडण्यात आल्या. सध्या बँकेचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र राज्य असून ३४ संपूर्ण संगणीकृत शाखासह बँक कार्यरत आहे.

दि. ३१ मार्च २०१४ रोजी ठेवी रु. १४३६४३.३७ लाख, कर्ज रु. १००२५४.१३ लाख व भागभांडवल रु. ४७९५.५६ लाख एवढे आहे. बँकेचा नफा रु. १५१७.३१ लाख एवढा आहे. तसेच सी.आर.ए.आर. १२.७७% एवढा आहे. तसेच ऑडिट वर्ग 'अ' प्राप्त झाला आहे.

बँकेचा व्यवसाय वाढत असतांना बँकेने आपले सामाजिक दायित्व सुद्धा वेळोवेळी पूर्ण केले. होतकरू उद्योजकांना कर्ज रूपाने मदत करण्यात आली. समाजसेवी संस्थांना रुग्णवाहिका समर्पित करण्यात आली. कार्यक्षेत्रात विविध ठिकाणी होणाऱ्या वृक्षारोपण तसेच रक्तदान कार्येक्रम आयोजित करण्यात आले. ग्राहकांना RTGS, NEFT या सारख्या सेवा बँक प्रदानकरीत आहेच. त्यासोबत लवकरच ATM व्दारा सेवा ग्राहकांना देण्याकरीता ATM ची सोय उपलब्ध करून देणार आहे.

यवतमाळ जिल्हा हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना बँक वेळोवेळी मदत करीत असते. सभासदांना सुद्धा त्यांच्या वैद्यकीय उपचाराकरिता साहाय्य करण्यात येते.

बँकेने वरील प्रगती करतांना शक्य त्या ठिकाणी कार्यरत शाखांकरीता स्वतः ची इमारत खरेदी केली आहे. जसे यवतमाळ मुख्य शाखा, पाटणबोरी, वणी, अकोला, घाटंजी, नागपूर. बँकेचा व्याप वाढल्यामुळे बँकेच्या मुख्य कार्यालयाची इमारत अपुरी वाटते. त्यामुळे मुख्य कार्यालयाच्या सर्व सोयी सुविधांनी सुसज्ज अशा इमारतीचे बांधकाम यवतमाळ येथे सुरू आहे.

सध्या बँकेने १७०० कोटी ठेवींचे उद्धिष्ट ओलांडले असून आपल्या सर्वांच्या विश्वासावरच बँकेची प्रगती अवलंबून आहे. दि. ३१ मार्च २०१५ रोजी बँकेच्या ठेवी रु.१७०६५५.५८ लाख, कर्ज रु. ११९१३८.९९ लाख, भागबंडवाल रु.५७४१.९८ लाख एवढे असून गेल्या सहा वर्षांपासून बँकेला ऑडिट वर्ग 'अ' प्राप्त झालेला आहे.

सध्या कार्यरत असलेल्या संचालक मंडळाच्या कुशल नेतृत्वात सुवर्ण महोत्सवी वर्षा निमित्य बँकेने २००० कोटींच्या ठेवी गोळा करण्याचे लक्ष्य ठरविले आहे व ते निश्चितच पूर्ण होणार आहे.

धन्यवाद !
"जय सहकार"